नवी दिल्ली, १० फेब्रुवारी २०२३ : सुपरहिट चित्रपट ‘कंतारा’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, चित्रपटाच्या ‘वराह रूपम’ गाण्याबाबत निर्मात्यांवर चोरीचा आरोप आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विजय किरगंडूर आणि ‘कंतारा’चे निर्माते-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना दिलासा दिला आहे. चित्रपटात ‘वराह रूपम’ हे गाणे दाखवले जाणार नाही, असा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कंतारा’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यासोबतच चित्रपटातून गाणे हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विजय किरगंडूर आणि ऋषभ शेट्टी यांना गाण्याच्या कॉपीराइट उल्लंघनाच्या तपासासंदर्भात १२ आणि १३ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहिल्यावर त्यांना अटक केली जाणार नाही.
ऋषभ शेट्टीचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील ‘वराह रूपम’ या गाण्यावर केरळ बँड तैकुदम ब्रिजने चोरीचा आरोप लावला होता. तो म्हणाला होता की चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या ‘नवरसम’ गाण्याची कॉपी केली आहे. यानंतर कायदेशीर कारवाई करत ‘वराह रूपम’चा व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट करण्यात आला. मात्र, चित्रपटातून हे गाणे हटवण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने हे गाणेही चित्रपटातून काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक