Religious Site Demolition Notice Sparks Protest in Pimpri: कुदळवाडीतील प्रार्थनास्थळांवर महापालिकेने अचानक हातोडा उचलला! गुरुवारी (दि. २४) अनधिकृत बांधकामांच्या नोटिसा थडकल्या आणि शुक्रवारी (दि. २५) संतप्त नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नेतृत्वाखाली महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर धडक मारली. प्रशासनाच्या या अनपेक्षित कारवाईने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलकांनी महापालिका प्रशासन जातीय विद्वेष पसरवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या एका फटक्यात कुदळवाडी आणि चिखली भागातील ३१ प्रार्थनास्थळांना १५ दिवसांची डेडलाईन मिळाली आहे. नोटिसीत स्पष्टपणे बजावण्यात आले आहे की, या मुदतीत अनधिकृत बांधकाम हटवले नाही, तर पालिका स्वतः बुलडोझर चालवणार! या कारवाईच्या इशाऱ्याने कुदळवाडीतील नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी तातडीने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या मांडला.
यापूर्वी याच भागात अनधिकृत गोदामे आणि उद्योगांवर कारवाई झाली, तेव्हा प्रार्थनास्थळांना वगळण्यात आले होते. मग आता अचानक धार्मिक स्थळांना लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका आयुक्तांच्या चुकीच्या धोरणामुळे शहराची शांतता आणि सलोखा धोक्यात येत आहे, असा आरोप आंदोलक नेते मारुती भापकर, अजिज शेख, रियाज चौधरी, फैयाज सिद्दिकी आणि इतर कार्यकर्त्यांनी केला.
हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बांधकाम परवानगी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सहीने बजावण्यात आलेल्या नोटिसा प्रार्थनास्थळांच्या दारावर चिकटवण्यात आल्या आहेत. या नोटिसा म्हणजे नागरिकांच्या श्रद्धेवर आणि भावनांवर थेट आघात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता या आंदोलनाची दखल घेऊन महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या १५ दिवसांत जर नोटिसा मागे घेतल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे