गोल पोस्ट इतर राजकारण युवा पिढीला प्रोत्साहित करण्याच्या जुन्या आठवणींना शरद पवारांच्या कडून उजाळा

युवा पिढीला प्रोत्साहित करण्याच्या जुन्या आठवणींना शरद पवारांच्या कडून उजाळा

पुणे, २६ ऑक्टोबर २०२२ राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासत युवकांना राजकारणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या जुन्या आठवणींना शरद पवारांनी आज पुन्हा एकदा उजाळा दिला. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पुरंदर दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्याला हाताला धरून खुर्चीमध्ये बसवले व त्याच्या समवेत फोटो काढले. यामुळे युवा वर्गामध्ये नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

१९९० च्या दशकात युवा कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये संधी देताना, नवीन फळी तयार व्हावी या उद्देशाने शरद पवारांनी अनेक त्याकाळच्या युवा कार्यकर्त्यांना पुढे आणले. यामध्ये प्रामुख्याने अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विजय कोलते, सुनील तटकरे, यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

शरद पवार आजही राजकारणामध्ये अपार मेहनत करतात. राजकारणात कार्यकर्ता किती महत्वाचा असतो, हे अधोरेखीत करणारी कृती पवार यांनी केली. एका सामान्य कार्यकर्त्याला शरद पवारांनी कार्यालयातील खुर्चीवर हात धरुन बसवले. आपल्या पक्षाच्या अध्यक्षाच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता खुर्चीवर बसायला तयार नव्हता. पण पवारांनी स्वतःच्या हाताने धरून त्याला जबरदस्तीने, प्रेमाने खुर्चीत बसवले.आणि त्यांच्यासमवेत फोटोही काढले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पवार पुरंदर दौर्‍यावर असताना त्यांनी तालुक्यातील परिंचे याठिकाणी शेतकरी संवाद कार्यक्रमापूर्वी पुष्कराज जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी पुष्कराज जाधव यांनी शरद पवारांना कार्यालयातील मुख्य खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी पुष्कराज जाधव यांना स्वतःच्या हाताने धरले. त्यांच्या दंडाला पकडून खुर्चीपर्यंत आणले आणि खुर्चीवर बसवले.

पवारांची ही कृती उपस्थित कार्यकर्त्यांना सुखावून गेली. कार्यकर्त्याला ऊर्जा देऊन उत्साहित करण्यासाठी, सोशल मीडियामध्ये शरद पवारांच्या या कृतीचे विशेष कौतुक होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version