सरीसृप- मांजऱ्या साप (Common Cat Snake) निम्न विषारी

मांजऱ्या साप हा निम्न विषारी आहे. या सापांचे डोळे मांजरासारखे बटबटीत असल्याने त्याला ‘मांजऱ्या’ नाव पडले. त्यांची जीभही लांब असते. हा अंगाने सडपातळ असतो. त्यांचे शरीर व शेपटीही त्यामानाने लांब असते. शेपटी निमुळती होत होत शेवटी ती अत्यंत बारीक झालेली असते. रंग फिकट तपकिरी किंवा पिंगट असतो. त्यावर गर्द रंगाच्या खुणा असतात. डोक्यावर Y आकाराचे चिन्ह असते. शरीराच्या खालच्या भागाचा रंग पांढुरका किंवा पिंगट असतो. पोटावर खवले असतात. कधीकधी पोटावरील प्रत्येक खवल्यावर बारीक बारीक ठिपके असल्याचेही आढळून येते. खवले गुळगुळीत असतात. याची सरासरी लांबी सव्वा मीटर असते. वीण काळात मांजऱ्या साप ६ ते ८ अंडी घालतो.

मांजऱ्या दिवसा झाडांच्या पानांत वेटोळे घालून बसलेले असतात. दिवसा कित्येक वेळा ते झुडपे, गवताने शाकारलेली घरांची छपरे किंवा झाडांच्या सालीखाली थंडाव्याला राहतात. या जातीच्या या सापाचे विष सौम्य असते. त्यामुळे त्याने पकडलेले भक्ष्य निपचीत पडून राहते. मांजऱ्याच भक्ष्य प्रामुख्याने सापसुरळी व इतर प्रकारचे सरडे आहेत. कधीकधी ते उंदीर व लहान पक्षीही खातात. मांजऱ्या साप निरुपद्रवी आहेत. मात्र चवताळले, की सर्वांगाचे पट्ट वेटोळे करून त्यातून डोके आणि त्याच वेळी शेपटीही थरथर हलवत असतात.

मांजऱ्या साप व फुरसे यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे या सापांनाही फुरसे समजण्याची अनेकदा गल्लत होते. मांजऱ्या हा जाड फुरशापेक्षा लांब व सडपातळ असतो. भारतात या सर्पाच्या अकरा उपजाती आहेत. मांजऱ्या सर्पाव्यतिरिक्त या जातीचे इतर साप डोंगराळ प्रदेशात आढळतात. त्यांपैकी ‘फॉरस्टेन मांजऱ्या’ हा दोन मीटर लांब असतो. ‘अंदमान मांजऱ्या’ हा फक्त अंदमान व निकोबार बेटांतच दिसून येतो. ‘कॉमन मांजऱ्या’ भारतात सर्वत्र पठारी प्रदेशात आढळून येतात. हिमालयातला मांजऱ्या समुद्रसपाटीपासून ३००० मीटर उंचीवरसुद्धा सापडतो. हा साप दक्षिण भारतात सामान्यपणे आढळून येतो. निशाचर असल्याने मांजऱ्या क्वचितच दृष्टीस पडतात.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा