श्यामेलिऒन हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिला असतो, त्याच्याबद्दल वाचलेलं असत तोच हा श्यामेलिऒन. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपुर्ण भारतभर विविध प्रकारचे सरडे आढळतात. आपल्या अंगणात, शेतात जातायेता सहज दिसणाऱ्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा सरडा नाही. श्यामेलिऒन दुर्मिळ असल्याने सहज आढळत नाही. भारतात या सरड्याची फ़क्त एकच जात मिळते नी ती सुद्धा मुख्यत्वे दक्षिण आणि मध्य भारतात.
श्यामेलिऒन सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरु होतं. खडबडीत दिसणारं ह्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, चकली सारखी गोल वळलेली शेपूट, दुर्बिणीसारखे गोलगोल फिरणारे डोळे आणि शरीराला न शोभणारे लुकडे पाय त्यासोबतच डायनोसॉर्स ची आठवण करुन देणारा याचा जबडा अस याच वर्णन.
हा सरडा क्वचीतच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही श्यामेलिऒन झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदुच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या ह्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी बिळ खोदुन त्यात अंडी घालते. आपण नेहेमी पहातो की आपल्या समोर दिसणारे सरडे अगदी तुरुतूरू पळत असतात. पण ह्याच्या अगदी विरुद्ध श्यामेलिऒन करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहुल घेत विचार करुन हा सरडा प्रत्येक पाउल टाकतो. अगदी कुशल कसरतपटुप्रमाणे हा लवचीक फ़ांद्यांवरही मस्त हालचाली करतो.
बरेचदा आपण या सरड्याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहू शकतो. हा चपळपणे धावु शकत नाही पण त्याची जिभ हे त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट आहेत. याचे डोळे नरसाळ्याप्रमाणे एका शंकुच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकु स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फ़िरु शकतात. म्हणजे ह्याच भक्ष दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलुन हळुच जबडा उघडुन थोडी जिभ पुढे काढुन तयार रहतो. आणि क्षणार्धात याची आठ ते नऊ ईंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचुन तोंडात घेते. याच पद्धतीने श्यामेलिऒन किडे मकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे मटकवुन टाकतात.
श्यामेलिऒनला धावता येत नाही, त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी सभोवतालच्या रंगानुरुप होणं म्हणजेच कॆमोफ़्लेज (camouflage) होऊन स्वतःला वाचवणं. ह्याच्या शरिरातल्या रंगपेशी मेंदुकडुन आज्ञा आल्यावर तो जिथे असेल त्या सभोवतालचा हुबेहुब रंग धारण करायचा प्रयत्न करतात. रंग बदलला तरी शत्रु जवळच आला तर हा स्वत:च अंग आणि गळा फ़ुगवुन आपण भयानक असल्याच भासवतात. यांना दात असतातच. त्यामुळे चावल्यास लहानशी जखम होते. इतर सरपटणार्या प्राण्यांप्रमाणेच श्यामेलिऒनला जिवंत भक्ष लागतं. दुर्मिळ असणारे हे सरडे, सध्या अतिदुर्मिळ झाले आहेत. लोक यांना पाळण्यासाठी घरात पिंजऱ्यात ठेवतात. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार श्यामेलिऒनला पाळणं, मारणं गुन्हा आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.