सरीसृप- धामण (Rat snake) बिनविषारी

धामण हा भारतात सर्वत्र आढळणारा बिनविषारी साप आहे. हा साप दक्षिण व आग्नेय आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सिंध, तिबेट, नेपाळ, श्रीलंका, बांगला देश, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, थायलंड, दक्षिण चीन इत्यादी प्रदेशांत आढळतो. भारतात पट्टेरी धामण (टायास फसिओलेट्स) आणि वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती आढळतात.धामण कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात मोडतो. याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस आहे. धामणचे इंग्रजी नाव रॅट स्नेक हे त्याच्या खूप जास्त उंदीर खाण्याच्या सवयीमुळे पडले आहे.

धामण सापाची लांबी साडेसात ते आठ फूट किंवा त्याहून अधिक असू शकते. धामण सापाच्या शरीरावर दाट करडा, पिवळसर अथवा तपकिरी अशा विविध छटा आढळतात. शरीराचा घेर दहा सेंमी.पर्यंत असतो. शेपूट टोकदार, मान बारीक असून डोके लांबट व स्पष्टपणे वेगळे दिसते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळ्या असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा सोनेरी असतो. पाठीवरील खवल्यांच्या कडा काळ्या असतात व त्यामुळे धामणच्या शरीरावर जाळे असल्यासारखे दिसते. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पांढरट, पिवळसर असते.

धामण हा एक चपळ साप आहे. तो पाण्यात जलद पोहू शकतो. पोहताना त्याचे डोके पाण्याच्या बाहेर असते. झाडावर चढण्यातही हा साप तरबेज आहे. त्याच्या मार्गात असलेल्या वस्तूला पकड मिळवण्यासाठी तो शेपटीने वेटोळे घालतो. त्यामुळे भक्ष्य पकडण्यास त्याला आधार मिळतो. पाली, पक्षी व इतर लहान पृष्ठवंशीय प्राणी हे त्याचे अन्न आहे. तसेच बेडूक, कासवाची लहान पिले, वटवाघळे व लहान साप तो खातो. त्याचे मुख्य भक्ष्य उंदीर आहे. एका सर्वेक्षणानुसार एक धामण साप वर्षाकाठी २५० पर्यंत उंदीर खातो. शेतातील उंदीर फस्त करून तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकऱ्याचा मित्र ठरतो. धामण आपले भक्ष्य पटकन गिळतो. प्रतिकार करू न शकणारे बेडकासारखे प्राणी तो जिवंतच गिळतो. नंतर तो आपल्या शरीरावर दाब देऊन पोटातील भक्ष्याला मारतो.

विणीच्या हंगामात नर आणि मादी धामण आपलं अर्ध शरीर वर उचलून एकमेकांना घासतात. ही क्रिया म्हणजे स्वत:च्या क्षेत्राचे रक्षण व इतर नर सापांना त्या क्षेत्रात येण्यास मज्जाव करणे यासाठी असते. मादी धामण पांढऱ्या रंगाची ६ ते १४ अंडी घालते. पिले तीन महिन्यांची झाल्यावर प्रौढावस्थेत येतात. धामण दिवस रात्र भक्ष्याची शिकार करण्यात दंग असतो. त्याचा वावर माणसाच्या आजूबाजूला जुन्या पडीक भिंती, झाडे-झुडपे, भातशेते इ. ठिकाणी असला तरी शक्यतो माणसाचे सान्निध्य तो टाळतो. परंतु आवडतं खाद्य उंदरांसाठी त्याला माणसांच्या जवळपासच राहावं लागतं. कारण उंदीर मानवी वस्तीतच जास्त प्रमाणात असतात.

हा साप बिनविषारी असला तरी,याचा चावा जोराचा असतो त्यामुळे जखम होऊ शकते. पर्यावरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्या दृष्टीने धामण अत्यंत उपयुक्त साप आहे. म्हणून संरक्षित सरपटणाऱ्या प्राण्यांच्या यादीत धामण सापाचा समावेश करण्यात आला आहे. या सापाविषयी आधी खूप गैरसमज होते, त्यातून हे साप सर्रास मारले जायचे. परंतु आता जनजागृतीमुळे शेतकरी आणि मनुष्याकडून यांना हानी पोहचवणे अत्यंत कमी झालं आहे. धामण सापांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण निर्माण होतय.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा