सिंधू, गंगा, यमुना, चंबळ, गंडक व ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये गॅव्हिॲलिस गँजेटिकस या जातीची लांब तोंड असलेली मगर आढळते. तिला सुसर किंवा घडियाल म्हणतात. ती मगरींमध्ये सर्वाधिक लांबीची असून तिची लांबी सोळा फुटापर्यंत असते. तिच्या लांब जबड्यात ११० पेक्षा अधिक दात असतात. मगर, ॲलिगेटर आणि केमन यांच्याप्रमाणेच हा प्राणी सरीसृपांच्या म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ‘क्रोकोडिलिया’ गणातील आहे. सगळ्या जगात याच्या फक्त दोनच जाती आहेत. एक भारतात आढळणारी गेव्हिॲलिस गँजेटिकस आणि दुसरी बोर्निओ व सुमात्रा बेटांत आढळणारी टोमिस्टोमा श्लेजेलाय.
भारतीय घडियाल सिंधू, गंगा, गंडक, ब्रह्मपुत्रा व महानदी यांत आढळतो. त्याची सरासरी लांबी सोळा फुटापर्यंत जरी असली तरी पंचवीस सत्तावीस फूट लांबीचे घडियाल आढळले आहेत. म्हणून या गणातील प्राण्यांमध्ये हा सगळ्यांत मोठा ठरतो. ज्या ठिकाणी नदीचे पात्र रुंद व प्रवाह संथ असतो अशा जागी हा प्राणी राहतो. घडियाल एकलकोंडा नसतो नदीच्या आसपास असणाऱ्या पाण्याच्या उथळ डबक्यात त्यांचे समूह राहत असल्याचे दिसून येते. घडियालचे मुख्य अन्न मासे आहे.
घडियालांच्या शरीराची रचना एकंदरीने मगराच्या शरीररचने सारखीच असते, पण तोंड हे फार निराळे असते ते बरेच लांब, चपटे व चिंचोळे असून त्याच्या टोकावर ढेकळासारखा दिसणारा मांसाचा गोळा असून त्यावर नाकपुड्या असतात. खालच्या जबडा चोविसाव्या दातापर्यंत एकजीव झालेला असतो. दोन्ही जबड्यांवर मोठे मजबूत, लांब व तीक्ष्ण दात असतात. वरच्या जबड्याच्या प्रत्येक बाजूवर तीसेक दात असतात. ॲलिगेटर, मगर इत्यादींपेक्षा घडियाल जास्त पाण्यात राहणारा प्राणी आहे. फक्त विणीच्या हंगामात ते जमिनीवर येतात. मासे हेच त्यांचे एकमेव भक्ष्य आहे. माणसाच्या वाटेला ते जात नाहीत. मादी एका खेपेला ४० पर्यंत अंडी घालते.
घडियाल भित्रा असून माणूस दिसल्याबरोबर तो गढूळ पाण्यात शिरून लपून बसतो, गुपचुप पाण्यात बुडून तळाशी जातो. पाण्यात पोहण्याची आणि जमिनीवर चालण्याची अथवा धावण्याची याची पद्धती थेट मगरासारखी असते. त्याला पकडून एखाद्या हौदात बंदिस्त ठेवल्यावर कित्येक महिने तो उपाशी राहू शकतो. बोर्निओ आणि सुमात्रात आढळणारी टोमिस्टोमा श्लेजेलाय ही घडियालाची जात जवळपास भारतीय घडियालासारखीच असते, परंतु कवटीच्या रचनेत थोडासा बदल असल्याने तिला निराळ्या वंशात घातले आहे. तिची जास्तीत जास्त लांबी बारा तेरा फुटापर्यंत असते.
मासे पकडण्याची जाळीत सापडून व अधिवास बदल यांमुळे सुसरींची संख्या दिवसेंदिवस खूपच कमी होत आहे. घडियालच्या कातडीसाठीही त्याची शिकार केली जाते. घडियालच्या संरक्षणासाठी चंबळ नदीच्या परिसरात घडियाल संरक्षण केंद्र तसेच गंडक नदीच्या परिसरात कतरनिया घाट वन्य प्राणी अभयारण्य या संरक्षित क्षेत्राची निर्मिती केलेली आहे. चेन्नई क्रोकोडाईल बँक येथे काही काळापूर्वी घडियालच संवर्धन करण्यासाठी प्रजनन केंद्र सुरू केलं गेलं. या विलक्षण वेगळ्या अशा सरीसृपाच्या बचावासाठी जगभरात आणि खासकरून भारतात वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग तसेच जनजागृती केली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.