केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी स्मृतीभ्रंशावर केले नवीन संशोधन

13

लंडन, १८ ऑक्टोबर २०२२: इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी माणसांमध्ये अल्झायमर ची लक्षणे दिसण्यापूर्वीच या आजाराचे निदान करण्याचे संशोधन विकसित केले आहे. अल्झायमरसारख्या मेंदूच्या आजारांवर कायमस्वरूपी इलाज शोधण्याचा प्रयत्नांत असताना, हा शोध लागला. या संशोधना नुसार साधारण ९ वर्षाआधिच लक्षणानुसार रुग्णांवर उपचार सुरू करता येतील.

या संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांनी ४० ते ६९ वयोगटातील ५ लाख जणांच्या बायोमेडिकल डेटाचे विश्लेषण केले. त्यात जनुकीय, जीवनशैली आणि आरोग्याशी संबंधित माहिती घेण्यात आली होती. यात लोकांची स्मरणशक्ती, समस्या सोडवणे, प्रतिक्रिया वेळ, आकलन शक्ती आणि वजन वाढण्याची माहिती देखील होती.

परिणामांमध्ये असे आढळून आले की अल्झायमर असलेल्या लोकांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य, प्रतिक्रिया देण्याची वेळ, संख्या लक्षात ठेवण्याची आणि जोडण्याची क्षमता ही निरोगी लोकांपेक्षा खूपच खराब होती. या लोकांचा इतिहास पाहिला, तेव्हा कळाले की त्यांच्या मेंदूची क्षमता काही वर्षांपुर्वीपासूनच कमकुवत होत आली आहे.

स्मृतिभ्रंशाचा धोका असलेल्या रुग्णांचा या नवीन अभ्यासाचा सर्वाधिक फायदा होईल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या स्मृतीभ्रंश आणि पार्किन्सन्स या आजाराचे किमान एखादे लक्षण आढळल्यानंतर निदान केले जाते. तर मेंदूत होणारे हे बदल अनेक वर्षांपूर्वी किंवा अगदी दशकांपूर्वी घडू लागतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगातील ५.५ कोटी लोक हे स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत. यापैकी ६०% रुग्ण कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. स्मृतिभ्रंशाचे बहुतेक रुग्ण हे वृद्ध असतात. WHO च्या मते, २०३० पर्यंत, रुग्णांची संख्या ७.८ कोटी होईल. तर २०५० पर्यंत हा आकडा १३.९ कोटींवर पोहोचेल

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे