मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकारणात जिल्ह्यातील बाल कल्याण समिती सदस्यांचा राजीनामा घ्या- ॲड. रोहिणी खडसे खेवलकर

10

जळगाव ८ डिसेंबर २०२३ : जळगावातील एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक बालगृहातील सहा मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकारणात, जिल्ह्यातील बाल कल्याण समितीतील गुन्हे दाखल असलेल्या तीन सदस्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस प्रतिभा शिरसाठ, वर्षा राजपूत, आदिवासी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ममता सोनवणे, कार्याध्यक्षा कलाबाई शिरसाठ, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी नांदुरा येथील मुलींवर अत्याचाराचा उल्लेख करीत, पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत ६ ते १८ या वयोगटाच्या काळजी व संरक्षणांतर्गत येणाऱ्या बालकांसाठी कार्यरत जिल्ह्यातील महिला व बालकल्याण समितीवर टीका केली. खडके (ता. एरंडोल) येथील बालगृहातील मुलींवर अत्याचारप्रकरणी २६ जुलै २०२३ ला एरंडोल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलींच्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्यांसह बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्या विद्या बोरनारे व संदीप पाटील यांच्याविरुद्धही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

पीडित मुलींच्या जबाबानुसार, अत्याचाराबाबत चार महिन्यांपूर्वीच बालकल्याण समिती अध्यक्ष व सदस्यांना माहिती दिली. मात्र, त्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत कारवाई केली नाही. समिती अध्यक्षांसह सदस्यांनी प्रकरण गांभीर्याने घेत कारवाई केली असती तर मुलींवर अत्याचार झाला नसता. घटनेची सखोल चौकशीकामी राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तांनी पाच सदस्यीय तपासणी समिती गठीत केली होती. या समितीने अहवालही सादर केला आहे. बालकल्याण समितीतील अध्यक्ष व दोन सदस्यांवर बालकांसाठी काम करीत असतानाच त्यांच्या नैतिक भ्रष्टतेमुळे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनाही कायद्याचा बडगा बसणे गरजेचे आहे. न्यायासाठी बसलेली समिती हीच बालिकांची भक्षक असणारी सिद्ध झाली असूनही न्यायिक प्राधीकरण म्हणून कार्यरत असणए, ही अत्यंत खेदाची बाब असून, जनमानसांत बालकल्याण समितीची प्रतिमा मलिन करणारी आहे. पोक्सोअंतर्गत दाखल असलेल्या बालकल्याण समितीतील तीन सदस्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणीही ॲड. रोहिणी खडसे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा