कोल्हापुर, ३ फेब्रुवारी २०२३ : ‘ईडी’चे चार अधिकारी येऊन प्रश्न विचारून गेले म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काही तरी परीणाम होईल, असा जर कोणाचा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. बँकेचे लोकांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे जनता व ठेवीदार बँकेबरोबरच असणार आहेत. जाणीवपूर्वक सहकारी संस्थांना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आक्रमकपणे कर्मचारी चोख उत्तर देतील, असा इशारा अतुल दिघे यांनी दिला आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ‘ईडी’ने घातलेल्या छाप्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सकाळी एक तास आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर दोन्ही युनियनच्या वतीने द्वारसभा घेण्यात आली. या सभेत दिघे बोलत होते. यावेळी आर. बी. पाटील, दिलीप लोखंडे, दिलीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे बँकेचा परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्रात घडलेल्या लाजिरवाण्या राजकीय प्रकारामुळे सध्याची स्थिती पाहता खालच्या पातळीवर राजकारण सुरू असल्याचे दिसते. राजकरण करताना मर्यादेत राहून करावे. लोकशाही पद्धतीने समाजमनाचा कानोसा घेऊन राजकारण करण्यास कोणाची हरकत नाही; परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून संस्थांना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांना घ्यावी लागेल, असा इशारा दिघे यांनी यावेळी दिला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर