आसमंत आयोजित वाळूशिल्प प्रदर्शन, किनारा सहलीस रत्नागिरीकरांचा प्रतिसाद

रत्नागिरी,२१ जानेवारी २०२३ : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी, विवांत अनटेम्ड अर्थ फौंडेशन आणि कोस्टल कॉन्सरवेशन ग्रुप आयोजित पहिल्या सागर महोत्सवात आज वाळूशिल्प प्रदर्शन आणि समुद्रकिनारा व खारफुटी जंगल सफरींचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शेकडो पर्यटक, विद्यार्थी, जिज्ञासू व्यक्तींसह रत्नागिरीकरांनी सहभाग घेतला. रविवारीसुद्धा या सहली, सफरींचे आयोजन केले आहे. यामध्ये रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेण्याचे आवाहन आसमंत फाउंडेशनकडून करण्यात आले आहे.

भाट्ये समुद्रकिनारी वाळूशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन भाट्ये गावच्या सरपंच प्रीती पराग भाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. वाळूशिल्प पाहण्यासाठी दिवसभरात शेकडो विद्यार्थी, पर्यटक, रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती. यामध्ये समुद्राचे रक्षण, समुद्री कासवाचे संवर्धन, सैनिकांप्रती कृतज्ञता, गानकोकिळा लतादिदी मंगेशकर, जगभरात भारताचा नावलौकिक वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित वाळूशिल्पे साकारण्यात आली आहेत.

वाळूशिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास भाट्ये गावचे ग्रामविकास अधिकारी एल. एच. पाचवे, सदस्य अब्दुल भाटकर, आरोग्य सेवक शिवराज शेट्ये, आरोग्य सेविका सायली दळवी, समुदाय अधिकारी सारिका पाटील, डेटा ऑपरेटर सायली भाटकर आदींसह ग्रामस्थ, आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशनचे संचालक नंदकुमार पटवर्धन, सीए पुरुषोत्तम पेंडसे, सीए नितीन करमरकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, २ महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार, फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्रा. तेजस जोशी, मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. केतन चौधरी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी भाट्ये किनाऱ्याची पायी सैर घडवण्यात आली. यामध्ये कोस्टल कॉन्झर्वेशन ग्रुपचे प्रदीप पाताडे, रत्नागिरीतील पर्यावरणरज्ज्ञ अमृता भावे यांनी मार्गदर्शन केले. किनारपट्टीवरील छोटे छोटे प्राणी, त्यांचे निसर्ग साखळीतील स्थान, महत्त्व, आपण कसे वागले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली. याच दरम्यान सुमारे शंभरहून अधिक लोकांना कर्ला येथील कांदळवन सफर गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस, संतोष तोसकर व संजीव लिमये यांनी घडवली. दुपारच्या वेळेस पेठकिल्ला ते मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे व अमृता भावे यांनी घडवली.

कार्यक्रमाकरिता फिनोलेक्स कंपनी व सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. वाळूशिल्प प्रदर्शन, समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची अभ्यासपूर्ण सफर असे विविध कार्यक्रम झाले. आज झालेले सफरीचे कार्यक्रम उद्या रविवारी (ता. २२) होणार आहेत, इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आसमंतचे संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा