मुंबई, ५ ऑक्टोंबर २०२०: सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून समजली जाणारी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होईल याचा आज निकाल लागणार आहे. म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडं असंल याबाबत आज निर्णय येणार आहे. यासंदर्भात आज दोन निर्णय समोर येतील एक म्हणजे सकाळी ११ वाजता शिक्षण समिती, तर दुपारी दोन वाजता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आहे.
स्थायी समितीसाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव, भाजपकडून मकरंद नार्वेकर आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया मैदानात उतरले आहेत तर शिक्षण समितीसाठी भाजपकडून सुरेखा पाटील, शिवसेनेकडून संध्या दोषी, तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याचं बोललं जात आहे. तसंच सर्व समित्यांच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचाच उमेदवार बसणार, असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान अनिल परब यांनी असं म्हटलं होतं की, राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची विकास आघाडी आहे. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस पक्ष जरी दुसऱ्या बाकावर बसलेला असला तरीही शिवसेनेला काँग्रेसपासून कोणताही धोका नाही. तसंच केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल आणि शिवसेनेचा बीएमसीतील गड अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे