किरकोळ चलनवाढ सप्टेंबरमध्ये ८ महिन्यांच्या उच्चांकावर….

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर २०२०: अन्न व पेय पदार्थांच्या किंमती वाढल्यामुळं, किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ७.३४ टक्क्यांवर पोहोचला, गेल्या आठ महिन्यांतील हा उच्चांक आहे. दुसरीकडं ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) ८ टक्क्यांची घसरण दिसून आली.

सप्टेंबरमध्ये अन्नधान्यांच्या किंमती वाढल्यामुळं किरकोळ चलनवाढ ७.३४ टक्क्यांवर गेली. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई दर ऑगस्टमध्ये ६.६९ टक्के आणि सप्टेंबर २०१९ मध्ये ३.९९ टक्के होता. यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये किरकोळ महागाई ७.५९ टक्के होती.

खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ

सोमवारी सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई १०.६८ टक्के होती, ती ऑगस्टमध्ये ९.०५ टक्के होती. रिझर्व्ह बँक मुख्यत्वे पॉलिसीच्या दराचा विचार करता किरकोळ महागाईकडं पाहते.

ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात ८% घट

वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, उत्पादन, खाण आणि ऊर्जा क्षेत्राचे कमी उत्पादन झाल्यामुळं ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात ८ टक्के घट नोंदली गेली. औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार ऑगस्ट २०२० मध्ये उत्पादन क्षेत्राचं उत्पादन ८.६ टक्क्यांनी, खाण क्षेत्रातील उत्पादन ९.८ टक्क्यांनी आणि वीज क्षेत्रातील १.८ टक्क्यांनी घटलं.

कोरोना संकटाचा परिणाम

ऑगस्ट २०१९ मध्ये आयआयपी १.४ टक्क्यांनी घसरला. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, “कोविड -१९ च्या साथीच्या उद्रेकानंतर आयआयपी डेटाची साथीच्या आधीच्या महिन्यांतील डेटाशी तुलना करणं योग्य होणार नाही.” त्यात म्हटलं आहे की, ‘प्रतिबंधांमध्ये हळूहळू शिथिलता दिल्यामुळं त्यादृष्टीनं आर्थिक हालचाली सुधारताना दिसून आल्या आहेत. ही सुधारणा वेगवेगळ्या स्तरावर आणि आकडेवारीच्या अहवालाच्या स्तरावरही दिसून आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा