सेवा निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रक्कमेचा लाभ त्वरित मिळणार: यशोमती ठाकूर यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश

बारामती, ४ नोव्हेंबर २०२० : राज्यातील सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना एलआयसीची एक रक्कमी लाभ त्वरित मिळण्यासाठी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी दिलेला शब्द अखेर पाळला आहे. यामुळे राज्यातील सर्वच  अंगणवाडी सेविका मदतनीसांना दिलासा मिळाला आहे. या आदेशाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका  सेवा निवृत्त झाल्या नंतर त्यांना राज्य शासनाकडून एक रकमी म्हणून १ लाख रुपये लाभ दिला जातो. तर मदतनीस यांना ७५ हजार रुपये एक रकमी लाभ दिला जातो.

यामुळे आता अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी समाधान व्यक्त करत ठाकूर यांच्या आदेशाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांचे देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले. (९ ऑगस्ट) रोजी यशोमती ठाकूर बारामती दौऱ्यावर आल्या होत्या,  यावेळी त्यांनी बारामतीच्या बाल विकास प्रकल्प विभागाचा आढावा घेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत मिथुनकुमार नागमवाड यांना  कौतुकाची थाप दिली होती.

दरम्यान राज्यातील  अंगणवाडी सेविका, मदतनीस या सेवा निवृत्त झाल्या नंतर त्यांना  एलआयसीची एक रकमी लाभ मिळण्यासाठी अनेक कागद पात्रांची पूर्तता करून आटापिटा करावा लागत आहे, त्यांच्या रकमेसाठी २ ते ३ वर्ष वाट पहावी लागत होती.यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत बारामती पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी ही बाब यशोमती ठाकूर यांच्या निदर्शनास आणून निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी विनंती केली होती.

यावर महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रक्कम लवकर देण्यासाठी आश्वासन ही दिले होते. त्याचीच दखल घेत यशोमती ठाकूर यांनी महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत एलआयसी प्रलंबित असलेल्या राज्यातील सर्व सेविका,मदतनीस यांना एक रकमी लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता निवृत्त व निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लवकरात लवकर एलआयसीची एक रक्कम हाती मिळणार आहे. यामुळे आता वर्षानुवर्ष मिळणाऱ्या रकमेची वाट पहावी लागणार नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा