कश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येचा बदला पूर्ण, लष्कराने दहशतवादी लतीफला केले ठार

J-K, ११ ऑगस्ट २०२२: जम्मू-कश्मीरमध्ये कश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या करणारा दहशतवादी लष्कराने चकमकीत ठार केलाय. या चकमकीत लष्कराने एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. हे तिघेही लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी होते.

आता लष्कराची ही कारवाई महत्त्वाची आहे कारण यात दहशतवादी लतीफ रादरलाही मारण्यात आलंय. बऱ्याच दिवसांपासून सुरक्षा दलाची त्याच्या हालचालींवर नजर होती, त्याने खोऱ्यात अनेक हत्या केल्या होत्या, त्याने राहुल भटचीही हत्या केली होती. परंतु बुधवारी लतीफ आणि त्याचे साथीदार बडगाममध्ये असल्याची भक्कम माहिती लष्कराला मिळाली, त्यामुळं रणनीतीनुसार कारवाई करण्यात आली आणि चकमकीत तीनही दहशतवादी मारले गेले.

मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे. राहुल भटबद्दल सांगायचं तर, या वर्षी मे महिन्यात त्यांना एका दहशतवाद्याने ठार केलं होतं. राहुल हे महसूल विभागात काम करत होते, मात्र १२ मे रोजी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

या हत्येनंतर घाटीतील वातावरण चांगलेच तंग झालं होतं. बर्‍याच दिवसांनी काश्मीरमधून पंडितांचं पलायन दिसलं. बहुतेक कश्मिरी पंडित जम्मूच्या दिशेने गेले होते. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. त्यानंतर राहुल भट यांना न्याय द्या, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. कश्मिरी पंडितांना सुरक्षेची कोणतीही हमी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून सातत्याने टार्गेट किलिंग केली जात आहे. कश्मिरी पंडितांव्यतिरिक्त बाहेरील कामगार, सरपंच यांना लक्ष्य केलं जात आहे. खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मात्र ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून या दहशतवाद्यांचे मनसुबेही लष्कर सातत्याने हाणून पाडत आहे.

३७० रद्द केल्यापासून खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. त्यापैकी ५ ऑगस्ट २०१६ ते ४ ऑगस्ट २०१९ दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या ३,६८६ घटना घडल्या, ५ ऑगस्ट २०१९ ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केवळ ४३८ घटना घडल्या. याशिवाय ३७० रद्द करण्याच्या तीन वर्षांपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटनांमध्ये 124 नागरिकांचा मृत्यू झाला होता, जो विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर शून्य झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा