कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोकण, १३ जानेवारी २०२४ : कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३- २४ चे उद्घाटन महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, महसूलचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, आयकर विभाग आयुक्त डॉ. माधवी आर. एम., विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खेळाडुंनी संचलन करुन मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविकेत क्रीडा स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, यजमान पद मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्याने खूप चांगले आयोजन केले आहे. अशा स्पर्धांमधून विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळखी होतील. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल, असे सांगून त्यांनी या तीन दिवसीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राला विकासात्मक दृष्टीने पुढे नेणं हाच महसूलचा उद्देश आहे. महसूल आणि पोलीस खात्याला शासनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते महत्त्व असेच टिकवून ठेवावे. असे श्री. सामंत म्हणाले. विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले, महसूल विभाग वेगवेगळ्या पध्दतीची कामे वर्षभर करत असतो. या स्पर्धांच्या निमित्ताने या जिल्ह्यातून नव चैतन्य घेवून आपापल्या जिल्ह्यात चांगले काम करु. गुणांना वाव देऊ. हिरिरीने काम करु.

या कार्यक्रमानिमित्त नासा व इस्रोसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विजेत्यांना महसूल मंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. शेवटी कार्यक्रमाची सांगता करत अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी सर्वांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा