मुंबई, ३१ मे २०२३ : राज्यातील सहकार क्षेत्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे प्राबल्ल्या आहे. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दुधसंघ आणि शेती सहकारी सोसायट्या यावर सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यामुळेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सहकारी गृहनिर्माण संस्थांबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार सहकारी संस्थांमधील सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. मात्र आता यावर शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय बदलला आहे. आता या पुढे फक्त केवळ सहकारी संस्थांमधील सक्रिय सभासदांनाच मतदानाचा आणि निवडणुक लढवण्याचा अधिकार असणार आहे. या निर्णयाचा लवकरच अध्यादेश जारी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीला शह दिला असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची सहकार क्षेत्रावर मजबूत पकड आहे. याच माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांना पदे देऊन त्यांना सत्तेची संधी दिली जाते. त्यामुळेच सहकार क्षेत्रावर ग्रामीण भागात आपले वर्चस्व तयार करण्यासाठी आणि काँग्रेस राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेना (शिंदे गट)भाजपने हा निर्णय घेतल्याचे, या हालचालीतुन दिसून येते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर