मुंबई, १० सप्टेंबर २०२०: सुशांतसिंग राजपूत याच्याशी संबंधित असलेल्या ड्रग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला बुधवारी भायखळा तुरुंगात पाठविण्यात आले. ड्रग कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) मंगळवारी रियाला एनडीपीएस कायद्याच्या कलम १६/२० अंतर्गत अटक केली. रिया आणि तिचा भाऊ शौविकच्या जामीन अर्जावर आज विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाचा भाऊ शौविक आणि मिरांड यांना यापूर्वीच ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली होती.
एनसीबीने मंगळवारी रियाला न्यायालयात हजर केले. कोर्टाने रियाला २२ सप्टेंबरपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रात्र झाल्याने रियाला मंगळवारी रात्री तुरूंगात नेले जाऊ शकले नाही आणि एनसीबी लॉकअपमध्ये ती रात्र काढावी लागली. बुधवारी सकाळी १०.१५ वाजता एनसीबीने रियाला भायखळा तुरुंगात नेले. आता रियाच्या वतीने तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी बुधवारी सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होईल.
भायखळा तुरुंगात आहेत इंद्रायणी मुखर्जी
भायखळा कारागृहात एकूण १८ सेल असून ३५० महिला अंडरट्रायल कैद्यांची क्षमता आहे. या कारागृहात जेलरपासून तुरुंगातील बाकीचे कर्मचारी असे फक्त १० टक्के पुरुष तुरूंगातील कामगार आहेत. शीना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्रायणी मुखर्जीही या जेलमध्ये बंद आहे.
सुशांतच्या वडिलांची मानसोपचारतज्ज्ञाच्या विरोधात तक्रार
दरम्यान, सुशांतसिंग राजपूत यांचे वडील के के सिंह यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला एक पत्र लिहून मुलाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुसन वॉकर यांच्याविरूद्ध तक्रार केली. पत्रात त्यांनी सुशांतची वैद्यकीय स्थिती सार्वजनिक केल्याचा आरोप केला आहे. के के सिंह यांनी लिहिले आहे की ८.२ मेडिकल कौन्सिल (प्रोफेशनल कंडक्ट अॅटिट्यूड अँड एथिक्स) रेग्युलेशन २००२ नुसार नोंदणीकृत डॉक्टर आपल्या रूग्णाच्या गोपनीयतेचा भंग करू शकत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे