दिल्ली १९ जून २०२३: दिल्लीतील आरके पुरम येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. किशन आणि गणेश अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. आता या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे. यापूर्वी अर्जुन उर्फ अण्णा, देव आणि मायकल यांना अटक करण्यात आली होती.
व्यवहाराच्या वादातून आरोपींनी हा प्रकार केल्याचे बोलले जातय. मात्र, आत्तापर्यंत आरोपींच्या चौकशीनंतरही पोलीस कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा स्थितीत आता या सर्व आरोपींना कोठडीत घेऊन अधिक चौकशी केली जाणार असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे खरे कारण समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारीच सुमारे ५ हल्लेखोरांनी ही घटना घडवली होती. यामध्ये ललित या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, तेंव्हा तेथे त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या दोन बहिणी पिंकी आणि ज्योती यांना गोळ्या लागल्या. या घटनेत दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ललित आणि त्याच्या कुटुंबीयांची घटनेसंदर्भात चौकशी केली. या व्यवहाराबाबत ललित आणि देव यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले. ललितने देव यांना कर्ज म्हणून काही पैसे दिले होते, मात्र वारंवार विनंती करूनही देव पैसे परत करत नव्हता. नंतर काल देव हा ललितच्या घरी पोहोचला आणि त्याच्या सहित कुटुंबावरवर हल्ला केला, असा आरोप आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड