अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज भारत बंदची घोषणा, आरपीएफ आणि जीआरपी हाय अलर्टवर

नवी दिल्ली, 20 जून 2022: मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत. लाठ्या-काठ्या घेऊन तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी रेल्वेचे सर्वाधिक नुकसान केलंय. दरम्यान, 20 जून म्हणजेच सोमवारी काही संघटनांनी ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. याबाबत आरपीएफ आणि जीआरपी हाय अलर्टवर आहेत. नुकत्याच झालेल्या हिंसक घटनांनंतर आरपीएफ आणि जीआरपी खूप दक्षता घेत आहेत. त्यामुळं हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हिंसाचार करणाऱ्यांवर गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात येईल, असं आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय.

भारत बंदच्या घोषणेनंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक कोपऱ्यावर बारीक नजर ठेवली जाईल. आंदोलकांनी हिंसाचार केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. भारत बंद दरम्यान प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. यासोबतच मोबाईल, कॅमेरा, सीसीटीव्हीच्या माध्यमातून हिंसा करणाऱ्यांविरोधात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सेफ्टी गियर वापरावे’

जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ पुराव्याच्या आधारे संबंधित कलमांखाली संशयितांवर कारवाई केली जाईल. सर्व गुन्हे फौजदारी कलमांतर्गत नोंदवले जातील. भारत बंद दरम्यान हिंसाचाराच्या भीतीने, कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना संपूर्ण सुरक्षा गियर घालण्यास सांगितलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नका.

‘संवेदनशील स्थानकांना वारंवार भेट द्या’

मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत संवादाद्वारे आरपीएफला अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच संवेदनशील स्थानकांना वारंवार भेटी देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यादरम्यान सर्व अधिकारी स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या संपर्कात राहणार आहेत. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ कडक कारवाई केली जाईल.

विद्रोही घटकांवर बारीक नजर ठेवली जाईल

सर्व अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जावं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असं आरपीएफने म्हटलंय. विद्रोहींवर करडी नजर ठेवा. यासोबतच परिसरात फ्लॅग मार्च करत राहा. प्रत्येक इव्हेंटची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करा, जेणेकरून नंतर गरज पडेल तेव्हा त्याचा वापर करता येईल.

प्रत्येक घटनेसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येणार

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी उपद्रव निर्माण केल्यास किंवा रेल रोको केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. कोणतीही घटना घडल्यास, जीआरपी आणि स्थानिक पोलिस प्रत्येक घटनेसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करतील. एवढेच नाही तर एका स्थानकावर एकापेक्षा जास्त आंदोलने झाली तर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल केले जातील.

व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचा पुरावा वापरला जाईल

आरपीएफने म्हटलंय की हिंसाचाराच्या प्रकरणांची बारकाईने चौकशी केली जाईल, कायदेशीर कारवाई थांबवली जाणार नाही किंवा वळवली जाणार नाही. गुन्हेगारी कृत्यातील प्रत्येक आरोपीची ओळख पटवली जाईल. ज्यांनी हिंसाचाराचा कट रचला असेल किंवा लोकांना भडकावले असेल अशा सर्वांचा यात समावेश असेल. प्रकरणांच्या तपासासाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचा पुरावा वापरला जाईल.

या प्रकरणांचा तपास अनुभवी अधिकारी करतील

आरपीएफकडून सांगण्यात आलं आहे की, प्रत्येक तक्रारीची उच्च पातळीवर चौकशी केली जाईल, जेणेकरून कोणतीही कमतरता किंवा दोष राहू नये. या प्रकरणाचा तपास अनुभवी तपास अधिकारी (IO) यांच्याकडे देण्यात यावा, जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. यासोबतच प्रत्येक प्रकरणात ठोस पुरावे गोळा करण्यास सांगितलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा