आर आर पाटलांच्या मुलाची राजकारणात दमदार एन्ट्री, अनेक नेत्यांनी केलं कौतुक

सांगली, 20 जानेवारी 2022: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या निधनाच्या सात वर्षानंतर त्यांचा मुलगा रोहित पाटील यानं राजकारणात दमदार एन्ट्री केलीय. दिवंगत नेते आर आर पाटील यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात पंचायत समितींच्या निवडणुकांपासून सुरुवात केली. आता त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनं देखील पंचायत समितीच्या निवडणुकीत दमदार एंट्री मारली आहे. त्याच्या या दमदार यशाचं अनेक नेत्यांकडून कौतुक देखील करण्यात येतंय. विशेष म्हणजे रोहित पाटील यांनी नगरपंचायतीत आपल्या पॅनेलच्या 10 जागा निवडून आणल्या आहेत.

रोहित मन मिळावू कार्यकर्ता: अजितदादा

कवठेमहाकाळमध्ये सगळे एकीकडे आणि रोहित एकीकडे होता. रोहित विरुद्ध सर्व अशी लढाई होती. रोहितचं वक्तृत्व चांगलं आहे. त्याची कामाची पद्धत चांगली आहे. जमिनीवरचा नेता आहे. लोकांशी मिसळून वागतो. आर आर पाटलांचं ब्लड त्याच्यात आहे. मनमिळावू स्वभाव आहे. त्यामुळं त्याच्यावर लोकांनी विश्वास टाकला. आता त्यानं विकासकामं करावीत. त्याच्या प्रत्येक कामात आम्ही त्याला सहकार्य करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

लोकांमधील युवा कार्यकर्ता: रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनीही रोहित पाटील यांच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पाटील हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. रोहित पाटील जनतेत मिसळणारा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला, असं रोहित पवार म्हणाले.

हे तुम्हीही करू शकता: राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही रोहित पाटलांचं कौतुक केलं आहे. सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो. ती आपल्यात ताकद आहे. क्षमता आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, असं शेट्टी म्हणाले.

दणदणीत आणि खणखणीत विजय

राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत. या विजयानंतर आर. आर. पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी रोहित यांचं औक्षण केलं. हाच फोटो ट्विट करत रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी रोहित पाटील यांना दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा