RRB NTPC विद्यार्थी निषेध: विद्यार्थ्यांच्या निषेधाबाबत खान सरांसह अनेक संस्थांवर एफआयआर

बिहार, 27 जानेवारी 2022: RRB NTPC निकालाबाबत तरुणांचा विरोध सातत्यानं वाढत आहे. बिहारमध्ये सलग तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे थांबवण्याच्या आणि रेल्वे रुळ जाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, पटनामध्ये प्रसिद्ध खान सरांसह अनेक संस्थांच्या मालकांसह 400 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणी राज्याच्या राजधानीतील पत्रकार नगर पोलीस ठाण्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या जबानीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ताब्यात घेतलेल्या आंदोलक उमेदवारांनी असं म्हटलंय की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना हिंसाचार आणि दंगलीमुळं उत्तेजन मिळाले होते ज्यात खान सरांना कथितपणे RRB NTPC परीक्षा रद्द न केल्याबद्दल विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास सांगितलं होतं.

दुसरीकडं, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर खान सरांनी बुधवारी संध्याकाळी एक निवेदन जारी करून म्हटलं होतं की, आरआरबीने आता जो निर्णय घेतलाय, तो 18 तारखेलाच घेतला असता, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. पण आज एक चांगलं पाऊल उचललं आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

खान सर हे एक लोकप्रिय कोचिंग टीचर आहेत जे सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म यूट्यूबवर खान जीएस रिसर्च सेंटर चालवतात आणि त्‍यांच्‍या अनोख्या शिकवण्‍याच्‍या शैलीसाठी देखील ओळखले जातात.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भर्ती CBT-1 परीक्षेचा निकाल रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) द्वारे 14 आणि 15 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या निकालाच्या आधारे उमेदवारांना CBT-2 म्हणजेच फेज II परीक्षेसाठी निवडलं जाणार आहे. RRB NTPC निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय.

या संदर्भात बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या विरोधात विद्यार्थी सातत्याने ट्रॅकवर उतरत आहेत. बिहारच्या गया जिल्ह्यात बुधवारी आंदोलकांच्या जमावाने पॅसेंजर ट्रेन जाळली.

रेल्वेमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलं भावपूर्ण आवाहन

विद्यार्थ्यांच्या निषेधादरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना ‘सार्वजनिक मालमत्तेचं’ नुकसान न करण्याचं आवाहन केलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी नुकसान केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘मी माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती करू इच्छितो की, रेल्वे ही तुमची मालमत्ता आहे, तुम्ही तुमच्या मालमत्तेची काळजी घ्या. आतापर्यंत समोर आलेल्या तुमच्या सर्व तक्रारी आणि मुद्दे आम्ही गांभीर्यानं पाहू. कोणत्याही विद्यार्थ्यानं कायदा हातात घेऊ नये.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा