सोयगाव, छत्रपती संभाजीनगर ३० मार्च २०२४ : दुष्काळी मदत म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारी रात्री ७.३० पर्यंत २२ कोटी ७३ लाख ७१ हजार रुपये इतका निधी वर्ग करण्यात आला आहे. परंतु त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य असून शेतकऱ्यांना सीएससी केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी केले आहे.
ऑक्टोबर महिन्यात सोयगावचा अतिगंभीर दुष्काळात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय पथकांनी डिसेंबर महिन्यात पाहणी करून फेब्रुवारी सोयगाव तालुक्यातील दुष्काळाने बाधित झालेल्या ३२ हजार २९८ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८१ लाख रुपये मंजूर केले होते. त्यासाठी सोयगाव तहसीलच्या आपत्ती निवारण विभागाने शुक्रवारी रात्री साडेसात वाजता २२,२२५ शेतकऱ्यांच्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ई केवायसीसाठी अंगठा देताच २२ कोटी ७३ लाख ७१ हजार रुपये वर्ग करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, दुष्काळाच्या निधीसाठी शेतकऱ्यांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे मिळणाऱ्या रकमेतून आगामी खरिपाची पूर्वतयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना हातभार मिळेल. उर्वरित दहा हजार २९८ बाधित शेतकऱ्यांच्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी