३.५० लाख रुपये कर्जाचे वसूल केले ४१ लाख रुपये, दोघांन विरोधात गुन्हा दाखल, पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील घटना

पुणे, २९ मे २०२३ : पुणे जिल्ह्यात भोर तालुक्या मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सावकारी कर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३.५० लाख रुपये कर्जाची वसुली आरोपींनी व्याज आणी दंडासहित ४१ लाख रुपये वसुल केले आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील खेडशिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल रोकडे आणि गणेश रोकडे अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत मंगेश उत्तम घोलप यांनी फिर्याद दिली होती. राजगड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील रोकडे याने फिर्यादी मंगेश घोलप यांना सप्टेंबर २०१९ मध्ये ३ लाख ५० हजार रूपये व्याजाने कर्ज दिले होते. मोबदल्यात आरोपींनी फिर्यादीला शिवापूर वाड्यावरील मटणशॉप हे आपले पैसे दिल्याशिवाय उघडायचे नाही, असे म्हणून जातीवाचक बोलून, शिवीगाळ दमदाटी करून पिस्टलने जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीकडून आतापर्यंत १८ लाख रूपये रोख घेतले आहेत. तसेच फिर्यादीच्या शिवापूर येथील दोन सदनिका बँकेत तारण ठेवून फिर्यादीला न सांगता सह्या घेवून दोन सदनिकांवर २३ लाख रूपये कर्ज काढले. कर्जाची रक्कम व्याजापोटी स्वतःच्या खात्यावर वर्ग केली. तसेच बँकेचे सर्व कागदपत्र, एटीएम कार्ड आणि इतर कागदपत्र आरोपींनी स्वतःकडे ठेवले आहेत.

आरोपींनी ३.५० लाख रूपयांचे व्याज आणि दंडासहित फिर्यादीकडून १८ लाख आणि दोन सदनिकांवर घेतलेले कर्ज २३ लाख, असे एकूण ४१ लाख रूपये घेतले. याप्रकरणी फिर्यादीने आरोपींविरोधातच कायदेशीर फिर्याद दिली आहे. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा