जालना २२ फेब्रुवारी २०२४ : जालना येथील विघ्ने लॉन्स येथे आज डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कार्याची महती वर्णन करणाऱ्या ‘आनंद निधान’ या ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पू. ह भ प भगवान महाराज आनंदगडकर, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व पद्मश्री रमेशजी पतंगे उपस्थित होते.
यावेळी डॉ मोहन भागवत म्हणाले, ज्ञान, कर्म आणि भक्ती तिन्ही सोबत असेल तर उपयोग होतो. भक्ती नसेल तर ज्ञानाचा उपयोग होत नाही. विचार माणसाला देव आणि राक्षस बनवतो. हे समजण्याचा ज्ञान संतांकडे असते. आपण अनंत आकाशाला आपल्या कल्पनेत बांधतो तसे ईश्वराला पण पाहतो , पण प्रचिती देणारे संत असतात. त्यांना आपल्या कल्पनेच्या पलीकडले दिसते. त्यामुळे संतांच्या उपदेशाचा अनुसरण करणे हेच आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले.
भटके विमुक्त जगतात ते त्यांच्या व्यवसायसाठी नाही, तर ते जगतात धर्मासाठी. जी वस्तू ते विकतात त्याची आधी पूजा करतात. भटक्या समाजाकडे जे ज्ञान आहे, त्यामुळे सर्व समाजाचे कल्याण होत आहे. धातू, तंत्र, औषध, उपचार, तंत्र अनेक विद्या भटक्या समाजाला अवगत होते. परंतु भटक्या समाजाची दुरवस्था परकिय शासकांनी केली, त्याकडे आपणही दुर्लक्ष केले. पण त्यांना आपल्या संतांनी मुख्य प्रवाहात आणले असे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले.
हिंदू समाजाने पुरुषार्थ केला, अनेक वर्ष रामाला हृदयात ठेवलं म्हणून अयोध्येत सुवर्ण क्षण आपण पाहिला. आज जग भारताकडून बोध घेतोय. जग सुखी करण्यासाठी आपण मोठं झालं पाहिजे असे ते म्हणाले. तर भगवान बाबांनी आपल्या अभिभाषणा मध्ये मोहन भागवत म्हणजे आमच्यासाठी व्यक्ती नसून शक्ती आहे अशी भावना यावेळी त्यांनी बोलतांना व्यक्त केली.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी