नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा: मुख्यमंत्र्यांचे आदेश

3

यवतमाळ, २४ फेब्रुवरी २०२१: पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राठोड राजकीय वर्तुळात गेल्या दोन आठवड्यापासून चर्चेत राहिले आहे. विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सरकारकडे सातत्याने मागणी केली जात आहे. या घटनेच्या तब्बल सोळा दिवसांनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड माध्यमांसमोर आले आहे. त्यांनी काल वाशिमधील पोहरादेवी गडावर जाऊन जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यांनी पोहरादेवी येथे जावून सर्व समाधींची आणि देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर होम हवनमध्येही ते सहभागी झाले. यावेळी पोहरादेवी गडावर त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

कालच्या या घटनेनंतर विरोधकांनी ठाकरे सरकार वर टीका करण्यास सुरुवात केली होती. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाईचे आदेश दिले . या आदेशांवर स्वत: संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांचे आदेश

कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

काय म्हणाले संजय राठोड

पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा