पुणे, २१ नोव्हेंबर २०२०: पुण्यातील मनसेच्या रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या रूपालीताई पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवार म्हणून रूपालीताई निवडणूक लढवत आहेत.
रूपालीताई पाटील ठोंबरे यांना हा फोन साताऱ्यातून आला असल्याची माहिती आहे. ही जीवे मारण्याची धमकी फोन करून देण्यात आली. साता-यातील लबाडे नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. आरोपीनं फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवून टाकू’आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली आहे.
घडल्या प्रकारानंतर रूपालीताई पाटील यांनी पोलिसांत धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली. राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. पुण्यातही हि निवडणूक होत असून सर्व पक्षाचा प्रचार देखील चांगलाच जोर धरत आहे. पुण्यातील या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अश्यातच हि घटना घडल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव