Russia-India Deal, 16 जून 2022: जुने मित्र नेहमीच कामी येतात. सध्या ही गोष्ट रशिया आणि भारताच्या संदर्भात म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान, जिथं संपूर्ण जग रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, भारत आणि रशियाची जवळीक वाढत आहे. आता अशी बातमी आहे की दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँका म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि बँक ऑफ रशियाची पुढील आठवड्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
सुलभ पेमेंट सिस्टम
वास्तविक ही बैठक दोन्ही देशांमधील द्विपक्षीय पेमेंट प्रणालीसंदर्भात होणार आहे. या प्रणालीवर सहमती झाल्यास दोन्ही देशांमधील पेमेंट सुलभ होईल आणि कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन होणार नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर लादण्यात आलेले निर्बंध अधिक कडक होत आहेत.
उघडणार Loro किंवा Nostro खाती
लोरो किंवा नॉस्ट्रो प्रकारची खाती उघडण्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही केंद्रीय बँकांचे अधिकारी पुढील आठवड्यात भेटू शकतात. पूर्वीचे एक तृतीय पक्ष खातं आहे जिथे एक बँक देशातील दुसर्या बँकेसाठी खातं उघडते. तर दुसर्या पर्यायामध्ये, बँक दुसर्या देशातील दुसर्या बँकेत खातं उघडते.
ईटीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, दोन्ही केंद्रीय बँका भारतीय आणि रशियन चलनांमध्ये ही खाती कशी उघडता येतील हे पाहतील. ही दोन दिवसीय बैठक बुधवार आणि गुरुवारी दिल्लीत होऊ शकते.
या बैठकीला केंद्रीय बँकांव्यतिरिक्त दोन्ही देशांचे मंत्रालय, बँका आणि वित्तीय संस्थांचे अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आरबीआय आणि बँक ऑफ रशियाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एसबीआय, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आणि इंडसइंड बँकेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकतात. याशिवाय NPCI आणि FEDAI चे अधिकारीही सहभागी होऊ शकतात.
वाढत आहे सलोखा
रशिया आणि युक्रेननंतर जेव्हा जगानं रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली तेव्हा रशियाने भारताला कच्च्या तेलाची सवलतीत विक्री करण्याची ऑफर दिली. याचा परिणाम असा झालाय की अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या निर्बंधानंतरही रशिया आता भारताला तेल आयात करणारा दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. या प्रकरणात रशियाने आता सौदी अरेबियाला मागं टाकलंय. सध्या भारत सर्वाधिक कच्चं तेल इराकमधून आयात करतो. भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यांनी मे महिन्यात रशियाकडून सुमारे 25 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केलं. हे भारताच्या एकूण तेल आयातीच्या 16 टक्क्यांहून अधिक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे