सोलापूर १९ जून २०२३: रिंगरोड व सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेवरील बांधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळण्यासाठी, सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे येथे रयत क्रांती रिंग रोड संघर्ष समितीच्या वतीने, आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुरत-चैन्नई ग्रीनफिल्ड हायवे आणि सोलापूर रिंग रोड या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर येथील बाधित शेतकऱ्यांना, मोबदला रकमेची नोटीस मिळाली असून त्यात अतिशय अल्प रक्कम दर्शवण्यात आलीय. यामुळे आज सकाळी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळे येथे रयत क्रांती संघटना आणि तांदुळवाडी केगाव रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने, रयत क्रांतीचे जिल्ह्याचे नेते दीपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हायवे लगत जमिनीचे, जे चालू दर आहेत, त्यांच्या चार पटीने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत शेतकरी वर्गाचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आलाय.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर