नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२०: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी कोविड -१९, घसरती अर्थ व्यवस्था आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारचा कोविड -१९ बाबत सुनियोजित लढ्याने भारताला रसातळाला नेऊन ठेवलं आहे.
राहुल गांधींनी शनिवारी आपल्या ट्विट पुढे म्हटले की, जीडीपी मध्ये ऐतिहासिक २४ टक्क्यांची घट, १२ कोटी नोकऱ्या गेल्या, १५.५ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज, जगभरात सर्वाधिक कोविड -१९ प्रकरणे आणि मृत्यू. परंतु भारत सरकार आणि मीडिया साठी ‘सब चंगा सी’ (सर्व काही आलबेल).’
या पूर्वी राहुल गांधी यांनी चीन विवादावरून सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, मोदी आणि केंद्र सरकार चीनला आपल्या भू-क्षेत्रातून बाहेर काढण्यात अयशस्वी ठरत आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, ‘भारत सरकारनं मार्च २०२० पासून चीननं सीमेवरती जी स्थिती निर्माण केली आहे त्या विषयी बोलायला हवे. भारत सरकार चीनला आपल्या जमिनीतून बाहेर काढण्यात अपयशी ठरलं आहे, याव्यतिरिक्त आणखीन काही बोलणं व्यर्थ आहे.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे