मुंबई: गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा आहे. अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. रात्री अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजपा आमदारांकडून देण्यात आल्या. “नव्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम ने व्हायला हवं होतं. हे अधिवेशन नियमाला धरुन नाही. २७ नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन स्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहत आहेत. ही बहुमताची चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा सरकारसाठी आवश्यक असणार आहे.












































