मुंबई : ९०च्या दशकात संजय दत्तच्या “सडक” चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता त्याच्या फॅन्सला ‘सडक २’ या त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश भट करणार आहे. संजय दत्त आणि महेश भट्ट यांनी १९८६ साली आलेल्या नाम सिनेमात एकत्र काम केले होते.’नाम’नंतर दोघांमधले बॉडिंग घट्ट झाले होते.
याबाबत संजय दत्त म्हणाला, ‘सडक २’ चे बरेचसे शूटिंग पूर्ण झाले आहे. महेश भट यांच्यामधील उत्साह आजही तेवढाच आहे. आजच्या काळानुसार सिनेमाची स्टोरी लिहिली गेली आहे. संजय दत्त पुढे म्हणाला, महेश भट ज्यावेळी हा सिनेमा लिहिण्यासाठी तयार झाले, तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की जर तुम्ही हा सिनेमा दिग्दर्शित नाही केला तर मी या प्रोजेक्टमध्ये काम करणार नाही.
१९९१ मध्ये आलेल्या ‘सडक’ या सिनेमाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले होते. २० वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडले होते. पण आता तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतले आहेत.
संजय दत्तसह यात, पूजा भट, आलिया भट आणि आदित्य राय कपूर अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. १९९१ मध्ये ‘सडक’ चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते.१० जुलै २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.