नांदगावला सकल मराठा समाजाचा रस्ता रोको

नांदगाव, नाशिक, २४ फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली. त्यानुसार आज नांदगावला हुतात्मा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहायला मिळत होते. मात्र
या आंदोलनावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गाड्या व रुग्णवाहिका यांना येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात येत होता. याप्रसंगी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!, एक मराठा लाख मराठा अशा घोषण देत रस्ता रोको करण्यात आले.

हा रास्तारोको तब्बल दोन तास करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी नांदगाव तहसीलचे नवनियुक्त तहसीलदार सुनील सौंदाने यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागास ठरविल्यानंतरही शासनाने काही पुढार्यांच्या दबावाला बळी पडून बेकायदेशीर घटनाबाह्य आरक्षण दिल्याने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून हक्काचे कायदेशीर आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलने दिवसेंदिवस उग्र व तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन देत हे आंदोलन पूर्णत्वास नेले. मात्र उद्या पुन्हा वखारी, मालेगाव रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

या प्रसंगी विशाल वडघुले, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, महेंद्र बोरसे, राजेश कवडे, विलास आहेर, संतोष गुप्ता, नाना शिंदे, रमेश बोरसे, नंदू पाटील, विठ्ठल नलावडे, सुनील हांडगे, राजेंद्र देशमुख आदी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा