ढगाळ वातावरणामुळे गहू, ऊस, हरभरा, मका पिकांचे नुकसान; बळिराजा आर्थिक संकटात

फलटण, १२ डिसेंबर २०२२ : सध्या वातावरणात सतत बदल होत असतानाच फलटण तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली; परंतु ढगाळ वातावरण असल्याने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असतानाच बागायती पट्ट्यातील बळिराजा ढगाळ वातावरणामुळे धास्तावला आहे.

फलटण तालुक्यात पावसाळ्यात प्रमाणापेक्षा दमदार पाऊस पडला होता.त्यामुळे भरपूर थंडी पडेल असे वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असल्याने त्याचा फटका गहू पिकाला बसणार आहे. तांबेरा, पांढरा व काळा मावा, गहू पीक पिवळे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. एकरी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च होत असतो. अशा वातावरणाने त्याचे उत्पन्न कमी मिळते. त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. बळिराजाच्या पाचवीलाच संघर्ष पूजलेला आहे; परंतु शेतीमध्ये अनेकदा खर्च करून ‘ना प्रशासन लक्ष देते ना निसर्ग साथ देतोय.’ त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेला बळिराजा आर्थिक संकटात सापडतोय.

फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाव्हाबरोबरच उसाचेही क्षेत्र मोठे आहे. सध्या ऊसतोड सुरू असून, अनेक कारखान्यांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत; परंतु अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने ऊसतोडणी बंद पडणार आहे. त्यामुळे तोडलेल्या उसाचे नुकसान होऊन शेवटी शेतकऱ्यालाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गहू, ऊस, हरभरा, मका आदी पिकांचे नुकसान होणार असल्याने बळिराजा सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार