अहमदनगर: तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या साखर कामगारांनी थकित वेतन मिळावे त्यासाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये सहभागी सेवानिवृत्त कामगार सोपान पुंजाजी जगधने यांचे निधन झाले. उपोषण मंडपात अस्वस्थ वाटू लागल्याने इतर आंदोलकांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले होते. घरी गेल्यावर त्यांचे निधन झाले. मात्र, उपोषणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कामगारांनी केला असून प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, सोपान जगधने हे २०१०मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा पगार कारखान्याकडे थकीत नसून याउलट कारखान्याचेच जगधने यांच्याकडे २० ते ३० हजार रुपये येणे बाकी
असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.
थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी राहुरी येथील डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरू आहे. हा कारखाना सध्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. ऊस टंचाईमुळे यावर्षी कारखाना बंद आहे. त्यातच कारखान्याने बँकेचे कर्ज थकविल्याचा आरोप जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व काही संचालकांनी केला आहे.