डोंबिवलीत भेसळयुक्त तेलाची विक्री, तीन आरोपींना अटक,आरोपींकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

डोंबिवली १३ जून २०२३: दूध, पनीर नंतर आता खाद्य तेलामध्ये भेसळ होत असल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीत जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाला आहे. जनसामान्यांच्या रोजच्या वापरातील आणि जीवनावश्यक वस्तू म्हणून खाद्यतेलाकडे पाहीले जाते. भेसळ करणाऱ्या लोकांकडून,आता कमी दर्जाच्या खाद्यतेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर लावून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत होती. रामनगर पोलिसांनी या भेसळयुक्त खाद्यतेलाच्या गोडाऊनवर छापा टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता खालच्या दर्जाच्या खाद्यतेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर लावून संपूर्ण महाराष्ट्रत विक्री केली जात आहे. या खाद्यतेलाची विक्री मोठ्या प्रमाणात डोंबिवलीत केली जात होती. काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांनी डोंबिवली पूर्व येथील एका तेलाच्या व्यापाऱ्याला ताब्यात घेतले, यावेळी या व्यापाऱ्याने मुंबईतील एका डीलरकडून तेल घेतल्याची माहिती रामनगर पोलिसांना दिलेली.

यानंतर हे भेसळयुक्त तेल नेमके कुठे तयार होते याच्या शोधासाठी रामनगर पोलिसांनी विविध पथके बनविली होती. त्या नंतर रामनगर पोलिसांना मुंबईच्या मस्जिद बंदर येथे एका गोडाऊनमध्ये काही लोक, भेसळयुक्त तेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर लावत असल्याची माहिती मिळाली.यानंतर रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदशनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्या पथकाने मस्जिद बंदर येथील गोडाऊनवर छापा मारत कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी छापेमारीत, पाच लाख ४५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. दीपक जैन, तारिक मेहमूद, अतिक अहमद आणि दिलीप मोहिते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी अजून किती ठिकाणी भेसळयुक्त तेलाचे अड्डे बनवून अशा प्रकारे गोडाऊन उघडले आहेत, याचा तपास रामनगर पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा