मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२०: राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या पार गेली आहे. मुंबईतही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मुंबई पोलीस दलातील अनेकांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. ऊन, पाऊस, वादळ, वारा, पूर, भूकंप, दहशतवादी हल्ला अशा कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत मुंबई पोलीस आपलं कर्तव्य पार पडत असतात. मात्र अनेकदा काही नेते राजकारण करण्यासाठी मुंबई पोलिसांवर टीका करतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतात. पण तरीही याकडे लक्ष न देता मुंबई पोलीस आजही भर पावसात आणि कोरोनासारख्या महामारीत आपलं काम करत आहेत.
मुंबई पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे असं अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार मधील इतर मंत्री म्हणत असतात. पण गेल्या काही दिवसांत सुशांत सिंग राजपूतच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, नारायण राणे यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत सुशांतची केस सीबीआयकडे देण्याची मागणी केली.
आज मुंबई पोलिसांचं कौतुक खासदार करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. यात मुसळधार पावसात मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल आपली ड्युटी करत असल्याचं दिसतंय. सुप्रिया सुळेंनी लिहिलं कि, – ”आपली मुंबई सुरक्षित आहे ही @MumbaiPolice तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच…तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट…” एकूणच कोरोनाच्या या संकट काळात आपणही आपल्या रक्षणकर्त्यांचे आभार मानत त्यांचा आदर केला पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे