पुणे, २ ऑगस्ट २०२० : संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, पुणे जिल्हाकार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक ज्ञानदेव लोभे विनोद घोडके यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.
सतिश काळे यांनी अण्णाभाऊ बद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवन प्रवासला उजाळा देण्यात आला. यामध्ये बोलताना काळे म्हणाले अण्णाभाऊ साठे हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. ते केवळ कादंबरीकार नव्हते, तर कथाकार, पटकथाकार, शाहीर,नाटक,लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्यप्रकार शब्दबद्ध करणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. ते फक्त दीड दिवस शाळा शिकले.पण विश्वविख्यात साहित्याची त्यांनी निर्मिती केली.
त्यांनी दाखवून दिले की गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट आले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे जगातील अनेक महत्त्वाच्या भाषांमध्ये अनुवाद झाले. हेच खरे मराठी भाषेचे वैभव आहे. अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले. तसेच आण्णा भाऊ साठेंचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे.
ते म्हणतात, “पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर तरलेली नसून ती श्रमकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे,” यातून त्यांनी श्रमकऱ्यांचा कैवार घेतला.गिरणी कामगार, झाडूवाले,फेरीवाले यांचे दु:ख त्यांनी शब्दबद्ध केलं. तसेच आण्णा भाऊ साठे यांनी तमाशाला लोकनाट्याचे स्वरूप दिले.त्यांनी तमाशा आणि गणाला नवा आयाम दिला. लोककलांना समाज परिवर्तनाचे हत्यार बनवले.
आण्णा भाऊ साठे यांनी जनमाणसांच्या मराठीचा कैवार घेतला.श्रमकरी कष्टकरी, शेतकरी यांच्या मराठीला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले.त्यांनी मराठीला जगविख्यात केले.त्यामुळे मराठी भाषा दिन आण्णा भाऊ साठे यांच्या नावाने १ ऑगस्टलाच झाला पाहिजे व आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी मागणीही संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी