समता पतसंस्थेचे कार्य सहकाराला दिशादर्शक: प्रा.दिगंबर दुर्गाडे

नीरा : राज्यामध्ये अनेक सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. मात्र यामध्ये बऱ्याच पतसंस्था किंवा सहकारी संस्था तोट्यात असल्याचे दिसते. मात्र छोट्या गावात सुरू झालेली समता नागरी सहकारी पतसंस्था ही एक आदर्श पतसंस्था असून ती सहकाराला दिशा देण्यासाठी सूचक अशी आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी नीरा येथे बोलताना केले.
नीरा (ता.पुरंदर) येथे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे २१ वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे बोलत होते.
यावेळी डॉ.मनिभाई देसाई ग्रामीण विकास बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मा.बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीरेच्या उपसरपंच वर्षाचे जेधे, बी.जी. काकडे, शैलेश रासकर, अनिल चव्हाण, निंबुतचे सरपंच राजकुमार बनसोडे, सुधाकर टेकवडे राजेश काकडे,महेश काकडे आधींसह मोठ्या प्रमाणावर संस्थेचे सभासद उपस्थित होते. यावेळी दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, राज्यामध्ये दोन लाख ६८ हजार सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये ३५ शिखर संस्था, एकवीस हजार बासष्ठ विविध कार्यकारी सोसायटी, बावीस हजार तीनशे बिगर शेती सहकारी पतसंस्था, पंधराशे आठरा पनन संस्था, ऐकोणचाळीस हजार सातशेऐक्याऐंशी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था. एक लाख चाळीस हजार नव्यान्नव इतर सहकारी संस्था, तसेच दोनशेपेक्षा पेक्षा जास्त सहकारी साखर कारखाने आहेत तर चार हजार दोनशे शहात्तर नोकरदारांच्या पतसंस्था आहेत.
एकतीस हजार सहकारी डेरी एकशे चार सहकारी दूध संघ आहेत. मात्र यातील ४५ टक्के सहकारी संस्था तोट्यात असल्याचे दिसते. असले तरी ग्रामिण भागात स्थापन झालेल्या समता नागरी पतसंस्था केलेले काम अत्यंत चांगले आहे. संस्थेचा अत्यंत कमी असलेला वार्षिक एनपीए पाहता ही संस्था एक आदर्श संस्था आहे.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप माजी अध्यक्ष शहाजी काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण यांनी मार्गदर्शन करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेंद्र कांचन यांनी समता नागरी पतसंस्थेचे साधलेल्या प्रगतीचा आढावा घेत संस्थाचालक कर्मचारी यांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला .संस्थेच्या स्थापनेला आता २० वर्ष पूर्ण झाले असुन संस्थेचे आठरा हजार सभासद आहेत.
संस्थेकडे १५६ कोटींच्या ठेवी आहेत.११५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेचा एनपीए केवळ ५ टक्के आहे. तर संस्थेचा वार्षिक नफा २८ कोटी असुन संस्थेने प्रत्येक सभासदाचा एक लाखांचा अपघात विमा उतरवला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी सभासद कर्जदार व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक युवराज फरांदे व राहुल ढोले यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष उत्तमराव आगवणे यांनी मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा