माढा सोलापूर, दि. १४ जुलै २०२०: माढा तालुक्यात सध्या वाळू तस्करीने थैमान घातले असून राजकीय आशिर्वादाच्या बळावर प्रशासनही वाळू माफियांसमोर नांगी टाकताना दिसून येत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असून सगळीकडे लॉकडाउन असतानाही टेंभुर्णी व परिसरात वाळू तस्करी जोरात सुरू असल्याचे दिसून येते आहे.
गौण खनिज तस्करीवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा अंकुश राहिला नसून या तस्करीतून मिळणाऱ्या भरमसाठ पैशामुळे प्रशासनही वाळू माफियांशी हातमिळवणी करताना दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे दोन दिवसापूर्वी टेंभुर्णी परिसरात एका महिला मंडल अधिकाऱ्याने वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्परला पकडून टेंभुर्णी करमाळा रोडवरील ब्रिजजवळ कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर जमा झाले. सदर अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून बोलल्याने महिला मंडल अधिकारी व वाळू माफियामध्ये जोरदार बाचाबाची झाली.
यावेळेस मदतीसाठी अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना कळवून टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये पोहचल्या. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी यांनी या प्रकरणात हात झटकले. परंतु तहसिलदार या प्रकरणात पुढे आले. यामुळे वाळू माफियांचे राजकीय संबंध व पोलीस प्रशासनाशी असलेली हातमिळवणी झाल्याने अखेर वाळू माफियांचे या प्रकरणात पारडे जड झाल्याने प्रशासनाला वाळू माफिया समोर झुकावे लागले आणि त्या महिला मंडल अधिकारी यांना कारवाई न करता रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे चित्र टेंभुर्णीकरांना उघड्या डोळ्यांनी पहायला मिळाले.
टेंभुर्णी शहरात सलग दोन दिवस कारवाईचा फार्स केल्याची चर्चा अखेर झालीच. जर प्रशासन अशा पद्धतीने अवैध धंदेवाल्यांसमोर झुकत असतील तर सर्वसामान्य जनतेला कुणाचा आधार मिळणार अशी चर्चा जनतेतून उमटत आहे. सदर महिला मंडल अधिकाऱ्याला महसूल प्रशासनाची साथ मिळाली नाही. या मंडलातील सर्वच कर्मचाऱ्यांचे वाळू माफियांशी लागेबांधे असल्याने त्याचे लोन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यापर्यंत पोहोचले असल्याने या प्रकरणावर अखेर पडदा टाकण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी याबाबतीत लक्ष घालून योग्य ती कारवाई करतील काय? अशी चर्चा होत असून या प्रकरणाच्या विरोधात आंदोलन करण्याची भाषा वेगवेगळ्या संघटनेतून करण्यात येत आहे. तरीही पोसलेल्या वाळूमाफियांशी पंगा घेण्याचे धाडस या भागातील कोणताही राजकीय पुढारी अथवा संघटना करणार का? अशीही जनतेतून चर्चा होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील