सांगली, ९ मार्च २०२३ : महानगरपालिकेत नोकरभरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बोगस जाहिरातीवर कोणीही विश्वास ठेवू नये. नोकरीच्या आमिषाने फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन उपआयुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
उपआयुक्त राहुल रोकडे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत कोणतीही भरती प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तरिही सोशल मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेत भरती निघाल्याबाबतची बोगस जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीवर कोणीही विश्वास ठेवू नये.
भविष्यात ज्यावेळी महानगरपालिकेमार्फत नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, त्यावेळी वर्तमानपत्र, अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करूनच भरती केली जाईल. त्यामुळे भरतीत बोगस जाहिरात; तसेच महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याच्या उद्देशाने कोणाच्याही आमिषाला बळी पडून फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन उपआयुक्त रोकडे यांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर