नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२३ : भारताचे टेनिसपटू सानिया मिर्झा हिने शुक्रवारी (ता. २७) तिच्या करिअरमधील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला. यामध्ये सानिया मिर्झा आणि तिचा जोडीदार रोहण बोपण्णा यांना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. याआधी सानियाने महिला दुहेरी ३ आणि मिश्र दुहेरी ३ अशी सहा वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेची जेतेपदे पटकावली आहेत; परंतु हा किताब पुन्हा मिळवण्यास सानिया मिर्झा अपयशी ठरली आहे.
सानियाने पुन्हा एकदा ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असते तर एक नवा इतिहास रचला गेला असता; परंतु सानिया मिर्झा आणि तिचा जोडीदार रोहण बोपण्णाच्या छोट्याशा चुकीमुळे अपयशाला सामोरे जात तिला ग्रँड स्लॅम स्पर्धेचा प्रवास संपवावा लागला. सानिया मिर्झाचा करिअरमधील ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असल्याचे तिने अगोदरच जाहीर केले होते. याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये ब्राझिलियन जोडीने ६-७,६-२ अशी मात करीत विजय मिळविला.
पहिल्या सेटमध्ये भारताची जोडी ५-३ ने आघाडीवर होती; पण त्यानंतर जोडीने चांगली लढत देत ६-६ असा बरोबरीचा स्कोर केला. ब्रेकमध्ये भारताची जोडी मागे पडल्याने पहिला सेट गमवावा लागला. तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील अपयश व ग्रँड स्लॅमच्या दबावामुळे सानिया आणि तिच्या सहकार्याने बऱ्याच चुका केल्या. त्यामुळे सानियाचे तिसऱ्यांदा किताब जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यात दुबईत होणाऱ्या जागतिक टेनिस स्पर्धेतही ती शेवटची खेळी खेळणार असून, तिच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.