मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ : लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आली आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधक विविध दावे-प्रतिदावे घोषणा करत आहेत. देशातील सत्ताधारी पक्ष आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरात दंगल घडवण्याच्या विचारात असल्याचा आरोप शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आम्हाला भीती वाटते की जसं गोधरा हत्याकांड केलं त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून ट्रेन बोलवतील आणि त्यातल्या एखाद्या ट्रेनवर हल्ला करतील. त्याच्या आगीचा डोंब उसळणार तर नाही ना अशी भीती वाटतेय.जसं पुलवामा घडू शकत त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल, असे देशातील प्रमुख विरोधी पक्षाना भीती वाटत आहे, अस संजय राऊत म्हणाले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या मंदिराचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजप राम मंदिराच्या उद्घाटनावेळी मोठा हल्ला घडवू शकतो असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी आज त्यांचा हा दावा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत या प्रकरणी विरोधी पक्ष सावध असल्याचे स्पष्ट केले आहे.
इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. याबैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. या बैठकीला देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहतील. यात देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, पण या बैठकीत जागा वाटपाची चर्चा या बैठकीत होणार नाही. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
इंडियाला कोणी काउंटर करू शकत नाही. आमची घोडदौड रोखणं कोणाला शक्य नाही. कोणी कितीही आडवे या… कुणी काहीही करू शकणार नाही. येत्या निवडणुकीत इंडियाच जिंकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. या लोकांनी गोध्रा घडवल्याचे सांगितले जाते. पुलवामा हल्ल्यावर संशय व्यक्त केला जातो. त्यानुसार २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून असे प्रकार केले जाऊ शकतात. या मुद्यावर इंडियाच्या बैठकीत चर्चा होईल. जनतेलाही अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत सावध आहोत, असे राऊत म्हणाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे