मुंबई, १२ फेब्रुवारी २०२३ :कोश्यारी यांना बदलले म्हणजे उपकार नाही केले, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. तसेच आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. मात्र याला उशीर केला असे राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, राज्याच्या जनतेने राज्याच्या राजकीय पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनांनी एक भूमिका घेतली आणि राज्यपालांच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये प्रथमच लोक रस्त्यावर उतरले. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केले. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्या, असेही त्यांनी सांगितले.
आधीचे राज्यपाल हे दबावाखाली काम करत होते. आता नवीन राज्यपाल हे राज्याला मिळाले आहेत त्यांचे नाव रमेश बैस आहे की बायस आहे माहित नाही, अशी मिश्कील मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे.
नवीन राज्यपालांचा आम्ही स्वागत करतो पण महाराष्ट्राची मागणी ही राज्यपाल बदला संदर्भात अनेक दिवसांपासून होती. तात्काळ राज्यपालांना हटवणं गरजेचे होते पण केंद्र सरकारने ते केले नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला आणि सामुदायिक बदल्यात झाल्या त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा घेतला.
पुढे राऊत म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पाठीशी घातले, याची इतिहासात नोंद राहील. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये. सध्याचे सरकार घटनाबाह्य आहे याचे भान राज्यपालांनी ठेवावे, असेही राऊतांनी यावेळी म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.