देशातील महिलांच्यात प्रचंड राग, महिलाच या सरकारला घरी पाठवतील, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई, २२ जुलै २०२३ : मणिपूरच्या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला.आता देशातील महिलांच्यात प्रचंड राग आहे.महिलाच या सरकारला घरी पाठवतील. महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते.

महिला हे सरकार बदलवून टाकेल असे जे ममता बॅनर्जी म्हणत आहेत ते मला पटत आहे.आमच्याकडेही फिडबॅक येत आहेत. देशातील महिला प्रचंड रागात आहेत. त्यांना वेदना झाल्या आहेत. मणिपूरची घटना असो, कुस्तीपटू महिलांचे प्रकरण असो की देशातील इतर घटना असो,या सर्व प्रकरणात केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घतेली आहे. त्यामुळे देशातील महिलांनी हे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.मोदींचे सरकार आले तेव्हा सर्वाधिक प्रचार महिलांनी केला होता.मोदींचे सरकार आणण्यात महिलांचा हातभार मोठा आहे.आता याच महिला सरकारला घरी पाठवतील,असे संजय राऊत म्हणाले.

मणिपूर फाईल कुणी दाखवो अथवा न दाखवो. मणिपूरमध्ये काय घडत आहे ते संपूर्ण जग पाहत आहे. मणिपूरमध्ये अशा शेकडो घटना घडल्या आहेत. आर्मीवर हल्ला होत आहे. सरकार केवळ पाहत आहे. मणिपूरची अवस्था काश्मीरपेक्षा भयंकर झाली आहे. काश्मीरमध्ये हिंदू-मुसलमान आणि भारत-पाकिस्तान केले जाते. ते मणिपूरमध्ये त्यांना करता येत नाही. मणिपूरमधून राजकीय फायदा होत नसल्याने भाजप शांत आहे.या ठिकाणी जर एखादा मुस्लिम व्यक्ती असता तर आतापर्यंत देशात कहर मजला असता, असा हल्लाच राऊत यांनी चढवला आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या घटनेवर भाष्य करण्याचे आवाहन केले आहे.देशात महिला राष्ट्रपती आहे. असे असूनही महिलांची नग्न परेड केली जाते. तरीही राष्ट्रपतींनी त्यावर अजून प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी सरकारला आदेशही दिले नाहीत,असे संजय राऊत म्हणाले.

मणिपूरमध्ये ४ मे रोजी हिंसाचारात दोन महिलांची जमावाने नग्न धिंड काढली होती. त्यानंतर शेतात नेऊन या दोन्ही महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दोन महिन्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संसदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांना अटक केली आहे. या चौघांची कसून विचारपूस सुरू आहे. त्यांच्याकडून अजून काही लोकांची नावे समजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता या प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा