मुंबई, २४ ऑगस्ट २०२४ : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशभरात भाजपा विरोधकांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून, मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊतांनी २०२४ मध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात आमचंच सरकार येणार असल्याचं म्हणत तपास यंत्रणांना जाहीर इशारा दिला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात पोलिस दल, तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया करत आहेत, त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना आणि कायद्याचे वाचन करावे. जिथे भाजपचा पराभव होईल असे वाटत आहे तिथे केंद्रीय तपास यंत्रणांना कार्यकर्ते, एजंट म्हणून पाठवले जात आहे. पण आम्ही घाबरणार नाही. इंडिया आघाडी तुटणार नाही. लक्षात ठेवा २०२४ मध्ये सर्व खोट्या कारवायांचा हिशोब होणार.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. या देशातील भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. देशात भाजपाविरोधी पक्षांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. १९७८ मध्येही चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना खटल्याला सामोरे जावे लागले होते. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, महाराष्ट्र तामिळनाडू येथे भाजपने आपल्या विरोधकांना खोट्या प्रकरणात गुंतवून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. काल पण झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये अशा धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. यांना दुसरं काही दिसत नाही, असे राऊत म्हणाले आहेत.
आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीच विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. हे सत्र दिल्लीसह राज्या राज्यात भाजपाचे लोक राबवत आहेत. तसेच याचा इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे