मुंबई: गोरेगाव येथे आज मनसेचं अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पहिल्यांदाच सावरकर यांची प्रतिमा मनसेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. या देशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला. हिंदुत्वाचा विचार देशाला अभिप्रेतच होता. बाकी सगळं ठीक आहे, आता काही लोकांना पालवी फुटली आहे. फुटू द्या. पण, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही. म्हणून फक्त २३ जानेवारीलाच नव्हे तर रोजच महाराष्ट्रासह देशात बाळासाहेबांचे स्मरण होत असते, असं संजय राऊत म्हणाले. आहे, असं सांगतानाच शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत प्रखरपणे पेटविली. स्वातंत्र्यवीर सावरकरानंतर ‘हिंदुह्दयसम्राट’ म्हणून बाळासाहेब आहेत, असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचा राऊत यांनी पुनरुच्चार केला. राज्यसरकारला शंभर दिवस पूर्ण होताच उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्येला जावे, असा सल्लाही त्यांनी दिला