सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली..? झाली गुप्त बैठक

6

मुंबई, २ जुलै २०२१: गेल्या काही दिवसांपासून महाआघाडी सरकार पडणार असल्याची चर्चा सातत्यानं चालू आहे. यासाठी अनेक गोष्टी देखील कारणीभूत आहेत. नुकतंच नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि आघाडी सरकार मधील नेत्यांची सातत्यानं सुरू असलेली चौकशी यामुळं आघाडी सरकारची कोंडी झालेली दिसतेय. याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आलीय. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

ही गुप्त बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीत एकही काँग्रेस नेत्याला बोलावण्यात आलं नव्हतं. आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सरकार मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दबदबा आहे. तुलनेत काँग्रेसला सरकार मध्ये फारसा हस्तक्षेप मिळाला नाही. या गोष्टी आघाडी सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं सूचित करतात.

या बैठकी बद्दल आणखीन एक बाजू समोर येत आहे. काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दिलेला नारा, आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकश्या, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयामुळं सरकारची झालेली कोंडी आदी पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ही गुप्त बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मोजकेच नेते उपस्थित होते. या बैठकीचं ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नव्हता. आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवलं शय. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावललं आहे. त्यात आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी करूनच लढण्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा