मुंबई, ५ ऑगस्ट २०२२: पत्रा चाळ जमीन मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहारानंतर हे समन्स बजावण्यात आले होते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार वर्षा राऊत उद्या म्हणजेच ६ ऑगस्टला ईडीसमोर हजर होणार आहेत. दरम्यान, मुंबईतील विशेष न्यायालयाने गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत चार दिवसांनी ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोमवारी पहाटे अटक करण्यात आलेल्या राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आणि आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले.
वर्षा राऊत या आहेत शाळेत शिक्षिका
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या भांडुप येथील शाळेत शिक्षिका आहेत. १९९३ मध्ये त्यांचं लग्न संजय राऊतांसोबत झालं होतं. वर्षा राऊत यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्या चित्रपट निर्मितीशी निगडीत असून त्यांचा अलीकडचा चित्रपट ‘ठाकरे’ होता. संजय आणि वर्षा राऊत यांना विदिता आणि पूर्वंशी या दोन मुली आहेत.
वर्षा राऊत पती संजय राऊत आणि दोन्ही मुलींसोबत व्यवसायात सक्रिय आहेत. राऊत कुटुंबीय भांडुपच्या फ्रेंड्स कॉलनीत असलेल्या बंगल्यात राहतात. संजय राऊत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार वर्षा राऊत या तीन कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. रायटर एंटरटेनमेंट एलएलपी हे सनातन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिद्धांत सिस्कॉन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये भागीदार आहेत. रायटरने ठाकरे या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०१४-१५ मध्ये प्रतिज्ञापत्रानुसार वर्षा राऊत यांचे उत्पन्न १३,१५,२५३ होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे