मुंबई : भारतीय संसदेच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिले जाते. कारण आजच्याच दिवशी १३डिसेंबर २००१ रोजी सकाळी ११वाजून ४०मिनिटांनी भारतीय लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला झाला होता.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. याच दरम्यान पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-महंमदच्या ५ दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला.
त्यावेळी अवघ्या ४० मिनिटांपूर्वी संसदेची कारवाई तहकूब करण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी बाहेर पडल्या होत्या. परंतु, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि परिसरात होते. हा हल्ला करून खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. मात्र सुरक्षा कर्मचार्यांनी प्रसंगावधान दाखवत सेंट्रल भवनाचे दरवाजे बंद केले आणि मोठा अनर्थ टळला.
दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे संसद परिसराला युध्दाचे रूप आले होते. सुरक्षा जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत पाचही दहशतवाद्यांना ठार केले आणि अर्धा तास चालंलेलं हे थरार नाट्य अखेर संपले. यात ७ जवान शहीद, तर २ कर्मचार्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. एका पत्रकाराचाही मृत्यू झाला.
या हल्ल्याचा सुत्रधार अफझल गुरूला फासावर चढविण्यात आल्याने शहिदांना खर्या अर्थाने श्रध्दांजली मिळाली आहे. मात्र या हल्ल्यानंतर आता संसदेची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच असा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.